वाळूज एमआयडीसीत दगडाने ठेचून अज्ञात तरुणाचा खून

Foto

औरंगाबाद: वाळूज औद्योगिक क्षेत्रातील बी सेक्टरमधील एका कंपनीसमोर असलेल्या ग्रीन बेल्टच्या जागेत दगडाने ठेचून एका अज्ञात तरुणाचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना आज सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनात वाढ होत आहे. त्यामुळे हा परिसर असुरक्षित मानला जात असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. वाळूज औद्योगिक वसाहतीतील बी सेक्टर स्टरलाईट कंपनी परिसरात मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या ग्रीन बेल्टमध्ये दगडाने ठेचून खून केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.घटनास्थळी रक्‍ताने माखलेला दगड होता तर मृत व्यक्‍तीच्या डोक्यावर व कानावर ठेचल्याचे निशाण होते. सदर अनोळखी तरुणाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.  पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन घाटी रुग्णालयात नेला असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. मृताच्या खिशातून धम्मपाल शांतावन साळवे या नावाचे आधारकार्ड मिळाले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गायकवाड यांनी दिली.